Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेचे (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) ऑनलाईन काम करणार नसल्याचं सोलापुरातील अंगणवाडी सेविकांनी सांगितलं आहे. त्यांनी फक्त ऑफलाईन फॉर्म भरून प्रकल्प कार्यालयात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेने ही भूमिका स्पष्ट केली आहे.
सोलापूरसह राज्यभर लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी पैसे घेतले जात असल्याचं समोर आलं आहे तर काही ठिकाणी सर्व्हर डाऊनची समस्या आहे. या परिस्थितीत सोलापुरातील अंगणवाडी सेविकांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याचं काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.
अंगणवाडी सेविका तुमच्या बहिणी नाहीत का? सोलापूर जिल्हा परिषदेसमोर मानधनवाढीसाठी अंगणवाडी सेविकांनी थाळीनाद आंदोलन केलं. “महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणता, मग अंगणवाडी सेविका तुमच्या बहिणी नाहीत का?” असा सवाल त्यांनी केला. कोणतीही योजना आली की तिचं काम अंगणवाडी सेविकांना दिलं जातं, पण मानधन वाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकार लक्ष देत नाही, अशी त्यांची तक्रार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली योजना आहे. जर तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल, तर अजूनही अर्ज करण्याची मुदत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत, म्हणजेच प्रतिवर्ष 18 हजार रुपये मिळतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेचे निकष:
- महाराष्ट्र रहिवासी असावे
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला असाव्यात
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे
- वय 60 वर्षांपेक्षा जास्त असू नये
अपात्रता निकष:
- 2.50 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले
- घरात कोणी कर भरत असेल तर
- कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
- कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त जमीन असली तर
- कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल (ट्रॅक्टर सोडून)
आवश्यक कागदपत्रे:
- आधारकार्ड
- रेशनकार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- अर्जदाराचा फोटो
- अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र
- लग्नाचे प्रमाणपत्र
योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाइल अॅप किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरता येतील. ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही, त्यांना अंगणवाडी केंद्रात मदत मिळेल.